Logo

योग्य वेळ साधणं म्हणजे काय

शेअर बाजारात गुंतवणूक म्हणजे जास्तीची जोखीम. ही थिअरी आजकाल सर्वांना तोंडपाठ असते. मात्र बहुसंख्य गुंतवणूकदारांमध्ये ही जोखीम उचलायची तयारी फक्त बाजार वर जातानाच असते. बाजारात पडझड सुरु झाली की या लोकांची चुळबुळ सुरु होते. मार्केट पुन्हा कधी वर जाणार, पुन्हा जागतिक मंदी येणार का, अमक्या चॅनेल वर पुढील दोन वर्षे खराब जातील सांगितलं मग गुंतवणूक थांबवूया का अशा विचारणा सुरु होतात. 'अहो पण जास्त जोखीम घ्यायची तयारी आहे म्हणाला होतात ना त्याचे काय झाले?' असं विचारलं तर उत्तर मिळतं 'ते जास्तीचा परतावा मिळणार असेल तर. आता कुठे पोर्टफोलिओमधे मुदतठेवी पेक्षा जास्त परतावा आहे?'. म्हणजे माझ्यावर कपाळावर हातच मारायची वेळ येते. जर कुठल्याच अनिश्चिततेशिवाय सतत जास्तीचा परतावा मिळणार असेल तर त्यात जोखमीचा प्रश्नच कुठे आला? ही जोखीम उचलायची म्हणजे अधून मधून बाजारात पडझड होते ती सहन करण्याची, त्यावेळी धीर धरण्याची, विचलित न होण्याची तयारी ठेवली पाहिजे. पण सातत्याने बाजार वरच जात असताना ही गोष्ट कितीही समजावून सांगायचा प्रयत्न केला आणि गुंतवणूकदारांनी 'हो,हो' म्हटलं तरी प्रत्यक्षात जेव्हा पडझड सहन करावी लागते तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया बहुतांशी अशाच येतात.

 

त्यामुळे, बाजार जोखीम म्हणजे नक्की काय, आणि त्यासाठी आपल्याला कशी मानसिक तयारी करून ठेवायला पाहिजे हे प्रत्येकाच्या मनाला भिडेल (नुसतं 'समजेल' नव्हे!) अशा पद्धतीने मांडणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. या विषयावरचा एक सहजसुंदर लेख नुकताच वाचनात आला. गंमत म्हणजे तो लेख वाचत होते त्याचवेळी रेडिओवर जुन्या 'बरसात की रात' चित्रपटातली कव्वाली लागली होती. त्यातली '... बहुत कठिन है डगर पनघटकी' ही ओळ जणू इक्विटी गुंतवणुकीला उद्देशून गायक म्हणतोय कि काय असं वाटलं तेवढ्यात त्याच्या सहकाऱ्यांनी 'ये इष्क इष्क है, इष्क इष्क' असा कोरस धरला. हे तर जणू त्या प्रश्नाचं उत्तर होतं 'ये रिस्क रिस्क है, रिस्क रिस्क!' जर जोखीम ही गोष्ट आपण व्यवस्थित समजून घेऊ शकलो तर हा 'पाणी भरायच्या घाटावर जायचा निसरडा रस्ता' आपल्याला कठीण वाटणार नाही. मला भावलेल्या त्या लेखाचा सारांश झी मराठी दिशांच्या वाचकांपर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न.

 

आपल्यातल्या प्रत्येकालाच इक्विटी गुंतवणुकीचे दीर्घकालीन लाभ हवे असतात, पण अनिश्चितता, पडझड इत्यादींचा त्रास सहन न करावा लागता. गुंतवणूकदारांना एक प्रश्न नेहेमीच पडलेला असतो की जर शेअर बाजारातील सर्वमान्य सूत्र 'कमी किंमतीला खरेदी करा, जास्त किमतीने विका' इतके सोपे आहे तर नफा कमावणं इतकं कठीण का असावं. शेअर्सचे भाव पडायची वाट बघायची आणि योग्य वेळ साधून खरेदी करायचे आणि ते वर चढले की योग्य वेळ साधून विकून टाकायचे. सोप्पं! बरोबर की नाही? पण यातला 'योग्य वेळ साधणे' हा जो प्रकार आहे तो खरंच प्रत्यक्षात येऊ शकतो का? या प्रश्नावर अर्थातच आपल्या आधी जगभरातील असंख्य तज्ज्ञांनी अभ्यास केलाय, अनुभव घेतलाय आणि त्यांचे विचार पुढील प्रमाणे आहेत:

 

'जगात दोन प्रकारचे गुंतवणूकदार आहेत. पहिले ज्यांना 'बाजारात योग्य वेळ साधणे' जमू शकत नाही, आणि दुसरे, ज्यांना 'बाजारात योग्य वेळ साधणे जमू शकत नाही' हे कळू शकत नाही' -- टेरी स्मिथ 

 

'बाजारात योग्य वेळ साधणे ही गोष्ट मला जमत नाही. आणि ती ज्याला जमते अशी एकही व्यक्ती माझ्या माहितीत नाही' --- वॉरन बफेट

 

'शेअर बाजारात योग्य वेळ साधण्याचं कसब आपल्याला साध्य असतं तर (आणि आकाशात उडण्याचं देखील!) असं उगीच आपल्याला वाटत असतं. पण प्रत्यक्षात ते कधीच कोणाला जमलं नाहीये, आणि कधीच जमणार नाही -- सेठ क्लार्मन 

 

'शेअर बाजारात योग्य वेळ गाठण्याची कसरत करणारे सहसा नुकसानीतच जात असतात' -- डेव्हिड स्वेनसन 

 

'गेली ५० वर्ष गुंतवणूक क्षेत्रात काम करूनदेखील शेअर बाजारात यशस्वीरीत्या योग्य वेळ साधण्याचं कसब असलेली एकही व्यक्ती माझ्या पाहण्यात नाही. माझ्या ओळखीच्यांच्या ओळखीत देखील असे कोणी नाही.' -- जॅक बॉगल 

 

यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? -- शेअर बाजार नजीकच्या काळात काय कोलांटउड्या मारेल त्याचे भाकीत वर्तवणे ब्रह्मदेवाला देखील अशक्य आहे.

 

ठीक आहे. पण मग २००७-०८ चा मार्केट क्रॅश असो किंवा २००९ मधील शेअर बाजाराने मारलेली वेगवान उसळी असो, आपण निरपेक्ष भावाने गुंतवणूक करत राहायची असा याचा अर्थ आहे का? 'योग्य वेळ साधण्यासाठी' वायफळ प्रयत्न नाही करायचे तर मग पडझडीची जोखीम सतत डोक्यावर बाळगत राहायचे का? अशा वेळी गुंतवणुकीचे मूल्य पडते त्याबाबत काय करावे? तर त्याचे उत्तर भारतीय रस्त्यांमध्ये दडलेले आहे! (होय, तुम्ही बरोबर वाचलंत!)

 

भारतीय रस्त्यांवरून ड्रायव्हिंग करणे आणि शेअर बाजारातील जोखमी सांभाळणे यात बरेच साधर्म्य आहे. कसे ते पहा --

 

माझ्या पाच वर्षं जुन्या गाडीला अनेक ठिकाणी लहान लहान पोचे, ओरखडे पडलेले आहेत. आपण कितीही काळजी घ्यायचा प्रयत्न केला तरीही भारतात गाडी वापरताना असे पोचे, ओरखडे पडणं हे अपरिहार्यच गोष्ट आहे. अगदी जवळून जाणारी वाहनं, अचानक गल्लीतून बाहेर येणारे भरधाव दुचाकीस्वार, अरुंद गल्ल्या इत्यादींमधून चुकून माकून वाचलोच तर पार्क करून ठेवलेल्या गाडीवरसुद्धा कोणीतरी लिखाणाचा सराव करून जातो. जर गाडी बाळगायची तर असले  लहानसहान ओरखडे आणि पोचे पडण्याची जोखीम आपल्याला उचलावीच लागते. त्यावर आपले काहीच नियंत्रण नसते.

 

असेच पोचे आणि ओरखडे आपल्या इक्विटी गुंतवणुकीच्या मूल्यावर अधूनमधून पडत असतात. त्यातून सुटका नसते. या तात्पुरत्या पडझडी म्हणजे जणू काही शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी भरायचे भावनिक मूल्य होय. ते वेळच्या वेळी भरत राहावे लागते. दरवर्षी निफ्टी त्याच्या उच्चान्कापासून किती पडतो याची गेल्या २५ वर्षांची आकडेवारी बघितली तर सरासरी २०% पडझड होते असे दिसून येते. 

 

यातून पहिला धडा काय शिकलो तर, शेअर बाजारात अधूनमधून तात्पुरती पडझड ही होतच असते. ती कोणीच आधी ओळखू शकत नाही आणि त्यापासून सुटकादेखील करून घेऊ शकत नाही. दीर्घकालीन गुंतवणुकीचा लाभ मिळण्यासाठी बाजाररुपी देवाला वाहिलेला तो भावनिक नैवेद्य समजावा आणि या कारणासाठी गुंतवणुकीतील सातत्य मोडू नये.

 

भारतीय रस्त्यांवरील ड्रायव्हिंग आणि शेअर बाजारातील गुंतवणूक यातील अजून साधर्म्य काय आणि त्यातून आपण अजून कुठले धडे शिकू शकतो हे आपण पुढील आठवड्यात पाहू.

 

--- प्राजक्ता कशेळकर